भारतीयांनी आता गुंडगिरी खपवून घेऊ नये – आनंद महिंद्रा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। बुद्धीमंतांचा गढ समजल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांना क्रूर पद्धतीने मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. फी वाढ, नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयांवर वातावरण तापलेलं असताना आधी जामिया मिलिया आणि आता जेएनयूमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही या घटनेवर ट्विटरच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. “आपले राजकारण काय आहे हे महत्त्वाचे नाही. आपली विचारधारा काय आहे याने काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही भारतीय असाल तर अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेऊ नये. जेएनयूत ज्यांनी हल्ला केला त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी”, अशी मागणी महिंद्रा यांनी केली.

विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातही उमटू लागले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरले. त्यांनी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या. मुंबईत आज सायंकाळी चार वाजता हुतात्मा चौकात या हल्ल्याचा संशय असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. ‘जॉइंट अक्शन कमिटी फॉर सोशल जस्टिस’च्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होणार आहेत. पुण्यातही आज सायंकाळी सात वाजता गुडलक चौकात निषेध सभा होणार आहेत. न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार आहे.

 

Leave a Comment