औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजा लावला होता. हा कारनामा त्याला चांगलाच महागात पडला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तब्बल 157 किलो गांजा तसेच तब्बल 9 लाख रुपये जप्त केले आहेत.
मोठा आर्थिक फायदा व्हावा यासाठी वैजापूरमधील एका शेतकऱ्याने चक्क तुरीच्या शेतात गांजा लावला होता. गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनदेखील या शेतकऱ्याने अवैध पद्धतीने गांजाची शेती केली होती. या कारनाम्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. नंतर पोलिसांनी कारवाई करून या शेतकऱ्याकडून तब्बल 157 किलो गांजा पकडला.
तसेच 303 गांजाची झाडे हस्तगत करून नऊ लाख रुपयांपेक्षाही जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्या या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.