कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे राज्य उत्पादन शुल्क कराड विभाग कराड यांच्या पथकाने अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या करणाऱ्या एकावर कारवाई केली आहे. या कारवाईत देशी दारू संत्रासह एक चारचाकी स्कॉर्पीओ असा 4 लाख 23 हजार 40 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने सदर कालावधीमध्ये अवैद्य मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतीबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप-आयुक्त कोल्हापुर वाय. एम. पवार यांचे मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सातारा अनिल चासकर यांचे आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क कराड विभाग कराड यांच्या पथकाने दि. 3 जून रोजी गोळेश्वर (ता.कराड) येथे अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या शंकर उत्तम सुर्वे (रा.नरसिंगपूर ता.वाळवा जि.सांगली) याचेवर मुंबई दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाईमध्ये चारचाकी महिंद्रा स्कॉर्पीओ क्रमांक (एमएच -13/एसी-1745 वाहन जप्त करण्यात आले आहे. सदर वाहनामध्ये देशी दारु संत्राच्या एकुण 384 बाटल्या मिळून आल्या असून वाहनासह एकूण रुपये 4,23,040 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे निरीक्षक राजेंद्रकुमार पाटील, उप निरीक्षक राजू खंडागळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सचिन बावकर, जवान विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे यांनी केली. यापुढेही सदर बंदच्या कालावधीमध्ये अशीच कारवाई करण्यात येईल असे विभागाचे निरीक्षक श्री राजेंद्रकुमार पाटील यांनी सांगितले.