हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी कोटामधील विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याच पालकांना जबाबदार ठरवले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी कोटात विद्यार्थ्यांनी लागोपाठ आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. तसेच, यावर्षी कोटा शहरात तब्बल 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली.
सर्वोच्च न्यायालयाने दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान म्हणले की, पालकांचा विद्यार्थ्यांवरील दबाव हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना कशी वागणूक द्यावी याचा विचार करण्याची पालकांना गरज आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे देशभरातील कोचिंग सेंटर्सला दिलासा मिळाला आहे. कारण की, कोटामध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला त्यांच्या पालकांनी कोचिंग सेंटरला जबाबदार धरले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये पाठवावे की नाही असा प्रश्न इतर पालकांसमोर उभा राहिला होता.
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय खंडपीठाने केली आहे. या सुनावणीवेळी न्यायमूर्ती म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला कोचिंग सेंटर जबाबदार नाहीत. तर पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहेत. त्यामुळे यात कोचिंग सेंटरची नाही तर पालकांची चूक आहे. मुख्य म्हणजे, या निकालानंतर न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना सल्ला दिला आहे की, ते ही याचिका घेऊन उच्च न्यायालयात जाऊ शकतात. कारण, कोर्टामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ज्यामुळे या आत्महत्यांमुळे थेट कोचिंग क्लासेसला जबाबदार ठरविण्यात येत आहे.