महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सातारा, सांगलीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, पाटण व जावळी तालुक्यातील काही गावांना आतापर्यंत भूस्खलन व पुराचा चांगलाच फटका त्यात महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावांपैकी 85 गावे अद्यापही संपर्कहीन आहेत. त्या ठिकाणी या गावात दळणवळण सुरु करणे व रस्ते करण्यासंदर्भात सातारा येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. त्याला जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्यासह उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्यात मोठया प्रमाणात भूस्खलन व पुराच्या घटना घडलेल्या आहेत. त्या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने मदतकार्य पोहचवत तब्बल एक हजार 324 कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यामध्ये साडेचार हजार लोकांचा समावेश आहे, तसेच आणखी 50 घरांना भूस्खलनाचा धोका आहे. पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त असून, मागील काही वर्षांपूर्वी भिलारजवळ भूस्खलन झाले होते. त्या वेळी महाबळेश्वर तालुक्यातील काही गावांचे स्थलांतरण होणार होते. मात्र, अद्याप हे काम जिल्हा प्रशासनास जमलेले नाही.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी जिल्ह्यात महाबळेश्वर, वाई, पाटण व जावळी तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यातील गावे अद्यापही संपर्कहीन आहेत. त्या त्या गावांचा शोध घेऊन, तेथे दळणवळणाची साधने पोचवावे, अशा सूचना केल्या. दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी महाबळेश्वर तालुक्यातील संपर्कहीन झालेल्या गावांमध्ये दळणवळणाच्या सुविधा उभारल्या जाणार असल्याची माहिती दिली.