औरंगाबाद | राज्याकडून मिळालेल्या लसीच्या प्रमाणात मराठवाडय़ात ४.२६ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये एक लाख १९ हजार ४५४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा, तर ५३ हजार ६६९जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्यात पोलीस दलात लसीकरणाचा वेग अधिक असून कोविड नियंत्रणासाठी अग्रभागी असणाऱ्यांनी लसीकरणाला वेग दिला. आतापर्यंत अग्रभागी काम करणाऱ्या एक लाख २३ हजार ५९९ जणांना पहिली मात्रा, तर २८ हजार २२३ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींही आता रांगा लावून लस घेण्यास तयार आहेत. अगदी ग्रामीण भागातही हे चित्र दिसत असून आता लस वितरण अधिक चांगल्या पद्धतीने करावे, अशी मागणी वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे शहरासाठी सोमवारी नव्याने लस उपलब्ध होणार आहे.
परभणी जिल्ह्यत लसीकरणाचे शेकडा प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८९.८९ एवढे आहे. रविवारी औरंगाबादसह बहुतांश शहरात लसीकरणाला वेग दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाडय़ातील लसीकरणाचा वेग इतर विभागाच्या तुलनेत अधिक असून नव्याने २८ लाख २९ हजार २८० लस देण्यात यावी अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. जेथे संसर्ग अधिक तेथे अधिक लसीकरण असे सूत्र अवलंबावे आणि लस अधिकाधिक उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, मराठवाडय़ातील रुग्णसंख्या वाढत असल्याने ४५ वष्रे वयोगटातील लोकसंख्या गृहीत धरुन नियोजन केले जात आहे. लस मात्रा वेळेवर मिळाल्या तर लसीकरणाला अधिक वेग देता येईल असे चित्र दिसत असून पहिल्या टप्प्यातील गरसमज आता पूर्णत: कमी झाले असल्याने लसीकरण केंद्राबाहेर रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र आहे. गेल्या दोन दिवसापासून लसीकरणाला वेग आला आहे. मात्र, खासगी रुग्णालयात काही ठिकाणी लस मात्रा कमी पडत आहेत. दरम्यान, औरंगाबाद शहरासाठी सोमवारी नव्याने लस मिळणार असल्याने रविवारी लसीकरण मोठय़ा प्रमाणात हाती घेतले जाणार आहे.