सांगली प्रतिनिधी । सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्यावतीने आयोजित दोन दिवसांच्या महालसीकरणा मोहिमेत 23 हजार 321 जणांनी लसीचा डोस घेतला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी दोन दिवसात आरोग्य यंत्रणेने चोख नियोजन केले होते. सांगली महापालिका क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विशेष महालसीकरण मोहिमेत एकूण 19 हजार 255 नागरिकांनी पहिला डोस घेतला होता.
या नागरिकांच्या पहिल्या डोसची मुदत आज संपल्याने त्यांच्यासाठी महापालिका क्षेत्रात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार 9 आणि 10 डिसेंबर या दोन दिवशी विशेष महालसीकरण मोहीम घेण्यात आली. या दोन दिवसीय मोहिमेत एकूण 86 केंद्रावर 23 हजार 321 इतक्या नागरिकांनी आपला पहिल्या आणि दुसऱ्या लसीचा डोस घेतला. महापालिकेच्या या महालसीकरणास मनपाक्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील, सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ज्या नागरिकांनी अद्यापि लसीकरण केलेले नाही अशा 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील यांनी केले आहे.