बैलगाड्यांच्या शर्यंतीत एकाच्या डोक्यात कुकरीने वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरेगाव शहरातील औद्योगिक वसाहतीसमोर बैलगाड्यांच्या शर्यती सुरू मुलांच्यातील भांडणे सोडवायला गेलेल्या एकाच्या डोक्यावर कुकरीने वार करून गंभीर जखमी केले आहे. या मारहाणी प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. खेलाजी महादेव मदने (वय- 28, रा. शिवथर, ता. जि. सातारा) असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. तर अक्षय मोहन जगदाळे, सुनील गणेश जगदाळे आणि जय तानाजी यादव (सर्व रा. कुमठे, ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विजय महादेव पाटोळे (वय- 48, रा. दरजाई, पो. दरूज ता. खटाव, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी विजय पाटोळे कोरेगावात बैलगाडी शर्यतीत बैल पळवायला आला होता. बैलगाड्या शर्यती सुरू असताना दुपारी दीडच्या सुमारास शर्यतीच्या मंडपाच्या मागे कुमठे गावातील मुलांमध्ये भांडणे सुरू होती. त्यात काही मुले एका लहान मुलाला मारहाण करीत होती. हे पाहून विजय पाटोळे यांचा भाचा खेलाजी महादेव मदने हा भांडणे सोडवायला गेला. त्यावेळी भांडणातील अक्षय, सुनील आणि जय यांनी त्या लहान मुलाला सोडून खेलाजी मदने यास हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली.

यावेळी खेलजीने प्रतिकार केला असता त्यामधील जय यादवने कुकरीने खेलजीच्या डोक्यात कानावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर खेलजीला उपचारार्थ तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, त्याला सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालयात पाठवले आहे. अधिक तपास कोरेगाव पोलिस करत आहेत.