सोलापूर | जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी गुलाबाचे फुललेले मळे पाहण्यास मिळतात. दररोज ताजे उत्पन्न देणाऱ्या या गुलाबावर गावातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. गावात सुमारे सव्वाशेहून अधिक एकरांवर गुलाबशेती असावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ गुलाब घेणारे वडजी हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.
सोलापूर- हैदराबाद महामार्गावर दहिटणेपासून आत 10 किलोमीटरवर वडजी हे अडीच हजार लोकसंख्येचं गाव आहे. सोलापूर शहराची बाजारपेठ हाकेच्या अंतरावर असल्यानं भाजीपाला, कांदा अशी पिके जास्त प्रमाणात होतात. एकेकाळी पडवळासाठी गाव प्रसिद्ध होते. परंतु अलीकडील आठ-दहा वर्षांत बाजारपेठेचं गणित बदललं. भाजीपाला- फळभाज्यांच्या दरांतील चढ-उतारामुळे वडजीतील शेतकरी गुलाब, झेंडू, शेवंती यासारख्या फुलशेतीकडे वळले.
शिवारात छोट्या- छोट्या बागांमधून लालचुटूक, पाकळ्या पसरून फुललेली देखणी गुलाब फुले आपले लक्ष वेधून घेतात. परिसरातील पिंजारवाडी, तांदूळवाडी या गावांतही फुलशेती चांगलीच वाढली आहे. वर्षभर मार्केटमध्ये चालेल या पद्धतीने ही शेती होते. वडजीत सुमारे सव्वाशे एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र या पिकाखाली असावे. बहुतांश शेतकरी दसरा,दिवाळीसाठी उपलब्ध होईल या पद्धतीने झेंडू लागवडही करतात. सुमारे 50 एकर त्याचे क्षेत्र असावे.