औरंगाबाद | वाळूज उद्योगनगरीला कोरोनाचा विळखा वाढत चालला असून, दीड महिन्यात ४२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागातील दोन कोवीड सेंटरमध्ये १९१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
परिसरातील मुख्य बाजारपेठा, भाजीमंडई तसेच कंपन्यांमध्ये अनेक जण मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचा वापर करीत नसल्यामुळे कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, तहसीलदार डॉ. अविनाश शिंगटे, गटविकास अधिकारी विजय परदेशी, मंडळ अधिकारी सतीश भदाणे आदींच्या पथकाने नुकतीच बजाजनगर व वाळूज परिसरास भेट देउन पाहणी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बजाज विहार व कामगार कल्याण केंद्रातील कोवीड सेंटरमधील रूग्णांशी चर्चा केली. या दोन्ही कोवीड सेंटरमधील बेडची संख्या, औषधींचा साठा, टेस्टींग आदींची माहिती त्यांनी घेउन विविध सूचना केल्या.
बजाजनगरमधील कामगार कल्याण भवनमधील कोवीड सेंटरमध्ये ९० तर बजाज आॅटोच्या बजाज विहार येथील कोवीड सेंटरमध्ये १०१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याचो वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी सांगितले. बजाजनगरात दररोज ३०० जणांची आरटीपीसीआर टेस्ट केली जात असून, कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस भर पडत चालल्याने उद्योगनगरीत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.