सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मामुर्डी येथे घरात पेटवलेल्या दिव्याच्या माध्यमातून आग लागतयाची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या आगीत दोन घरे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबात अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील मामुर्डी येथे आग लागण्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. या आगीत दोन्ही घरातील गृह उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले. गावातील एका घरात दिवा लावण्यात आला होता. त्या दिव्यापासून आग इतरत्र पसरल्याने त्या आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोट वाढल्यानंतर ग्रातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येऊ लागल्याने गराच्या परिसरात राहत असलेल्या लोकांच्या ते लक्षात आले.
त्यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचे लोट जमिनीपासून वर 30 ते 35 फूट असल्याने तात्काळ आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी पाण्याचा टॅंकर पाठवले. जावळी साताराचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या आगीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सातारा अजिंक्यतारा कारखान्यावरून अग्निशामक बंब मामुर्डी येथे पाठवले. त्यानंतर तब्बल एका तासानंतर संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.