हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जालना जिल्ह्यातील एका स्टील व्यावसायिकावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. इनकम टॅक्सच्या या कारवाईत 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती यासह तब्बल ३९० कोटींची मालमत्ता जप्त कऱण्यात आली आहे. इतके सगळे पैसे मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. विशेष म्हणजे, छापा टाकण्यासाठी येत असल्याची खबर कुणाला लागू नये म्हणून आयकर विभागाचे अधिकारी चक्क वऱ्हाडी बनून आले होते.
आयकर खात्याने या छापेमारीची माहिती अत्यंत गुप्त ठेवली होती. १ ऑगस्ट पासून ८ ऑगस्ट पर्यंत हे छापासत्र सुरु होते. या मोहीमेत एकूण २६० कर्मचारी दाखल झाले होते. इतक्या मोठ्याप्रमाणात आयकर खात्याचे कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाल्याचा सुगावा कोणालाही लागू नये, यासाठी हे सर्वजण वेगवेगळ्या वाहनांतून याठिकाणी दाखल झाले होते. वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दुल्हन हम ले जाएंगे, अशा स्वरुपाचे स्किकरही गाड्यांवर लावण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागाने नवीन एमआयडीसी मधील 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये तब्बल 390 कोटींची रोकड हाती लागली. ही रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 1४ तास लागले.