औरंगाबाद – कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दिल्लीत वेगाने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले असून, महाराष्ट्रात अद्याप साथीचा अंदाज नसला तरी शासनाने दिलेले लसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून लस हीच बचाव असून, नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण निर्बंध हटविले आहेत. जून-जुलै महिन्यात चौथी लाट येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असतानाच दिल्लीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीतील रुग्णांमध्ये कोणता व्हायरस आढळून आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नव्या लाटेबाबत राज्य शासनाचे देखील आदेश नाहीत. असे असले तरी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. यासंदर्भात मंडलेचा यांनी सांगितले की, सोमवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लसीकरणाची गती वाढविण्यावर चर्चा झाली. महापालिकेने दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना घरी जाऊन लसीकरण सुरू केले आहे. तसेच पवित्र रमजान महिना व वाढते उन्ह लक्षात घेऊन सायंकाळच्या वेळेस लसीकरण केंद्र सुरू ठेवले आहेत. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लसीकरणामुळेच नागरिकांचा बचाव झाला. त्यामुळे चौथ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी देखील लसीकरणच महत्त्वाचे आहे. त्यानुसार नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ. मंडलेचा यांनी केले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक लसीकरण केंद्रावर रांगा होत्या. त्यामुळे नागरिकांनी इतर भागात जाऊन लस घेतली. काही आरोग्य केंद्रांचे उद्दिष्ट शंभर टक्क्क्यांपेक्षा पुढे गेले आहे. असे असले तरी ज्या आरोग्य केंद्राअंतर्गत लसीकरण केंद्रावर पहिला डोस घेतला त्याच केंद्राने संबंधिताचा शोध घेऊन लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.