INDIA आघाडीच्या बैठकीत 2 मोठे निर्णय; राहुल गांधींची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी एकत्र आलेल्या INDIA आघाडीची (INDIA Alliance) बैठक आज मुंबईत पार पडली. देशभरातील एकूण २८ पक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी २ मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिली आहे. तसेच आपण जर असेच एकत्र राहिलो तर भाजप जिंकणं शक्यच नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आज इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर भव्य अशी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काही महत्त्वाच्या नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी राहुल गांधींनी बैठकीत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली. आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत २ मोठे निर्णय घेण्यात आले. त्यातील एक म्हणजे आम्ही १३ सदस्यांची समन्वय समिती स्थापन केली आहे आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबतचा निर्णय झाला असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी म्हणाले, मला विश्वास आहे की आपली इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल. आघाडीच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेले संबंध हेच आपलं खरं काम आहे. मागील दोन बैठकांमध्ये सलोख्या निर्माण करण्यासाठी आणि आपण सर्वांनी एक होऊन काम करावे हे सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण काम केले आहे.

आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी मोदींवर सुद्धा निशाणा साधला. मोदी आणि भाजप भ्रष्टाचाराचं घर असून केंद्र सरकार गरिबांचा पैसा उद्योगपतींना देत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच चीनने भारताच्या भूभागचा ताबा घेतल्याचा दावा सुद्धा राहुल गांधी यांनी केला. मी लडाखमध्ये एक आठवडा घालवला. चिनी लोक जिथे आहेत, त्यासमोरच मी पॅंगॉन्ग तलावावर गेलो. मी सविस्तर चर्चा केली, कदाचित लडाखच्या बाहेरील कोणत्याही राजकारण्याने लडाखच्या लोकांशी केलेली सर्वात तपशीलवार चर्चा असेल. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की चिनी लोकांनी भारताची जमीन घेतली आहे. मोदी खोट बोलत आहेत. लडाखमधील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की भारत सरकारकडून भारताच्या लोकांचा आणि लडाखच्या लोकांचा विश्वासघात केला गेला आहे असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला.