नवी दिल्ली । ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मान्यता दिली आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. सध्या 900 जणांवर त्याची चाचणी केली जाणार आहे. या लसीच्या तिसऱ्या डोसची ही चाचणी असेल. कंपनीने या चाचणीसाठीचा डेटा DCGI च्या विषय तज्ञ समितीकडे 3 आठवड्यांपूर्वी पाठवला होता. नाकावाटे देण्यात येणारी ही लस लोकांना ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी मदत करेल, असे सांगितले जात आहे.
असे म्हटले जात आहे की, भारत बायोटेकने बूस्टर डोस म्हणून नाकावाटे देण्यात येणारी लस वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. ज्यांनी यापूर्वी कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे त्यांना हा बूस्टर डोस दिला जाईल. या महिन्यापासून भारतात फ्रंटलाइन वर काम करणाऱ्या लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जात आहे.
कोणावर घेतली जाणार चाचणी?
भारत बायोटेकने त्यांची नोझल लस BBV154 आधीच लसीकरण केलेल्या लोकांमध्ये बूस्टर डोस म्हणून वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. या लसीच्या क्लिनिकल चाचण्या अशा लोकांवर केल्या जातील ज्यांनी आधीच कोवाशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन घेतली आहे.
नोझल लसीचे फायदे
सामान्य लसीपेक्षा नाकावाटे देण्यात येणारी लस अधिक प्रभावी असल्याचे बोलले जात आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा लस नाकावाटे दिली जाते तेव्हा पहिले नाकात अँटीबॉडीज तयार होतात. यामुळे श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत विषाणू पोहोचणे कठीण होईल. याचा परिणाम असा होईल की, नाकावाटे लस घेणाऱ्यांच्या फुफ्फुसात विषाणू पोहोचू शकणार नाहीत.
अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या विश्वनाथन यांनीही नाकावाटे देण्यात येणारी लस वापरण्यावर भर दिला. डॉ. सौम्या म्हणतात, ‘अशा प्रकारच्या लसीचा फायदा असा होईल की, ती घेण्यासाठी तुम्हाला दीर्घ प्रक्रियेतून जावे लागणार नाही. तुम्ही ते स्वतः वापरू शकता. यासाठी, तुम्हाला लस घेण्यासारख्या दीर्घ प्रक्रियेतून जावे लागणार नाही, तसेच तुम्हाला इंजेक्शनने वेदनाही होणार नाहीत.