नवी दिल्ली । आपल्या ऍपच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना पुरविण्याचे काम चीन करत असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सांगितले होते. यावर कारवाई करत भारत सरकारने चीनच्या ५९ ऍप वर बंदी घातली आहे. आता भारतीय सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना फेसबुक, इंस्टाग्राम वरील अकॉउंट डिलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ८९ ऍप डिलीट करण्याचे आणि अन इन्स्टॉल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे जर ऍप डिलीट केले नाहीत तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
भारतीय सैनिक तसेच अधिकारी यांच्यावर ऑनलाईन लक्ष ठेवण्याचे काम चीन आणि पाकिस्तान करत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सैन्याधिकाऱ्यांना त्यांचे व्हाट्सअप बंद करण्यास सांगण्यात आले होते. फेसबुकवर महिला म्हणून अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळविल्याच्याही घटना समोर आल्या होत्या. आता हे ऍप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.
ऍप डिलीट करण्यासाठी १५ जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आता ज्या सैनिकांच्या मोबाईल मध्ये हे ऍप मिळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. टिंडर, बम्बल बी, काऊच सर्फिंग, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅप चॅट, हंगामा, साँग्स पीके, वुई चॅट, क्लब फॅक्टरी, यासोबत बंदी घालण्यात आलेले ५९ ऍप देखील डिलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.