50 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कारवाई सुरू करत पुढील 13 दिवसांत भारतीय सैन्याने केले होते पाकिस्तानचे दोन तुकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारत-पाकिस्तान युद्ध 1971 | पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अत्यंत खराब होत चालली होती. दररोज हजारो निर्वासित लोकं सीमा ओलांडून भारतात येत होते. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढू लागला. 03 डिसेंबरच्या संध्याकाळी जेव्हा पाकिस्तानने भारताच्या हवाई पट्टीवर विमानांनी हल्ला केला, तेव्हा भारताने त्यांच्याविरोधात युद्ध घोषित केले. त्यानंतर पुढील 13 दिवसात भारताने ही लढाई नुसती जिंकलीच नाही तर पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश नावाने एका नवीन राष्ट्राला जन्म दिला.

03 डिसेंबरच्या संध्याकाळी, जेव्हा पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या काही हवाई तळांवर हल्ला केला, तेव्हा लगेचच भारताने युद्ध घोषित केले. भारतीय सैन्याने दोन आघाड्यांवर हल्ले करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्या रात्री भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानचे नौदल मुख्यालय उद्ध्वस्त केले, त्याच रात्री भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानाच्या हद्दीत प्रवेश केला. सुमारे 15 हजार किलोमीटरचा भूभाग ताब्यात घेतला. पूर्व पाकिस्तानात उपस्थित असलेल्या शत्रू देशाच्या सैन्याला या हल्ल्याने धक्काच बसला. दोन्ही देशांमधील या लढाईत सुमारे 4 हजार सैनिक मारले गेले.

ही लढाई फक्त 13 दिवसच चालली. यानंतर डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैनिकांनी सरेंडर केले. ज्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशचा जन्म झाला.मात्र, या लढाईची बीजे नऊ महिन्यांपूर्वीच रोवली गेली, जेव्हा पाकिस्तानचा हुकूमशहा याह्या खान याने पूर्व पाकिस्तानातील बंगालींवर अत्याचार सुरू केले. येथील लोकप्रिय नेते शेख मुजीबुर रहमान यांनी निवडणूक जिंकली तेव्हा ही निवडणूक तर नाकारली गेलीच मात्र त्यांना तुरुंगवासही झाला. यानंतर पाकिस्तानी सैन्य ज्या प्रकारे तेथे नरसंहार करत होते, त्यामुळे लाखो लोकं भारतात पळून येऊ लागले. त्याचा भारतावर परिणाम होत असल्याने भारताने पाकिस्तानसह अमेरिकेकडे ही परिस्थिती सुधारण्याचे आवाहन केले.

या काळात पाकिस्तानी सैन्याने 30 लाखांहून अधिक लोकं मारले होते, असे तत्कालीन पूर्व पाकिस्तानी लोकांचे मत आहे. लोकप्रिय नेते शेख मुजीबुर रहमान यांना तुरुंगातून सोडण्याची मागणी भारताने अमेरिका आणि पाकिस्तानकडे केली तेव्हा त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. मात्र परिस्थिती अशी बनली होती की, भारताला आलेल्या संपूर्ण परिस्थितीचा सामना करणे अवघड होत होते. मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा ओघ येण्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होत होता.

त्यावेळी भारताकडे इंदिरा गांधींसारखे भक्कम नेतृत्व होते तर दुसरीकडे पाकिस्तानातील लष्करी हुकूमशहा याह्या खान चांगले निर्णय घेऊ शकला नाही. भारताने अमेरिकेला ठणकावून सांगितले की, जर पाकिस्तान सहमत नसेल तर युद्धाशिवाय पर्याय उरणार नाही. मात्र अमेरिका आपला सातवा ताफा हिंद महासागरात पाठवेल, ज्यामुळे भारत अडचणीत येऊ शकेल, असा धोका होता. इंदिरा गांधींनी सोव्हिएत युनियनशी याबाबत चर्चा केली. अशा वेळी सोव्हिएत युनियन भारताच्या पाठीशी उभे राहिले.

पूर्व पाकिस्तानमध्ये वेगाने हालचाल करून भारताने तीन दिवसांतच त्यांचे हवाई दल आणि नौदल विभाग उद्ध्वस्त केला. यामुळे, पूर्व पाकिस्तानची राजधानी ढाका येथे पॅराट्रूपर्स सहजपणे उतरले, जे जनरल एएके नियाझी यांनी 48 तासांनंतर शोधून काढले. पाकिस्तानात निर्णय घेण्याचे अधिकार फक्त वरिष्ठ पातळीवरच केंद्रीकृत होते. त्यामुळे कोणताही निर्णय ग्राउंड लेव्हलपर्यंत यायला वेळ लागत असे. त्यामुळे पाकिस्तानला कोणतीही योजना वेगाने राबवता आली नाही. भारतात, लष्करप्रमुख माणेकशॉ यांनी दोन्ही कॉर्प्स कमांडरना निर्णय घेण्याचे अधिकार दिले. ज्यामुळे भारतीय लष्कर निर्णय घेऊन वेगाने हल्ला करू शकले.

भारताच्या प्लॅनिंगची योग्य माहिती पाकिस्तानला शेवटपर्यंत मिळवता आली नाही. पूर्व पाकिस्तानातील नद्या ओलांडून भारतीय सैन्य ढाक्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असे त्यांना वाटत होते. ते सीमेवरच अडकून राहतील. ही त्यांची चूक असल्याचे सिद्ध झाले. भारतीय लष्कराने पॅराट्रूपर्सच्या मदतीने ढाक्यालाच वेढा घातला. त्याचवेळी बांगलादेशच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या सैन्याच्या मुक्ती वाहिनीच्या मदतीने भारतीय सैन्य पूर्व पाकिस्तानच्या सीमेवरून घुसले.

केवळ 13 दिवसांतच भारताने पाकिस्तान बरोबरील युद्ध जिंकले. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी गुडघे टेकले. आजही पाकिस्तान हा पराभव विसरू शकलेला नाही. भारताच्या या विजयाने पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. पूर्व पाकिस्तान बांगलादेश म्हणून स्वतंत्र झाला. त्याला सर्वप्रथम भूतानने आणि त्यानंतर भारताने मान्यता दिली.