हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका गमावल्या नंतर भारतीय संघाला जागतिक क्रमवारीत पाहिले स्थानही गमवावे लागले आहे. भारतीय संघाचा खराब फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर असतानाच काही खेळाडूंना गंडलेला फॉर्म आणि काही जणांची दुखापत यामुळे भारतीय संघापुढे संकटाचा डोंगर उभा आहे.
यावर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात भारतातच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आयोजित केली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडून यंदा मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे भारताचे काही प्रमुख खेळाडूंना ग्रासलेले आहे. मधल्या फळीतील सुर्यकुमार यादवचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच भारतीय संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांनी विश्वचषकासाठी २० खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. यामधील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा दुखापतग्रस्त आहेत.
पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला होता आणि त्याची आयपीएलमध्येही खेळण्याची खात्री नाही. भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहही पाठीच्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. बुमराह यंदाच्या आयपीएल मध्येही भाग घेणार नाही. आणखी एक वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचीही अशीच अवस्था असून तो स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे आयपीएलमधून बाहेर आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे दीपक चहर सध्या तंदुरुस्त दिसत असून आयपीएल 2023 मध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूंना चांगल्या प्रदर्शनासोबतच फिटनेस वरही लक्ष द्यावे लागणार आहे.