हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांनी IIT- बॉम्बेला 315 कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. नंदन नीलेकणी यांनी IIT मुंबई मधूनच इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले होते. 1973 मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं. आज त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईला 315 कोटींची भली मोठी देणगी दिली.
ज्यांनी माझ्या सुरुवातीच्या आयुष्यात मला चांगल्या प्रकारे घडवलं. आणि आजपर्यंतच्या माझ्या प्रवासाचा खऱ्या अर्थाने पाया घातला ते आयआयटी -मुंबई माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे. ही देणगी आर्थिक योगदानापेक्षा जास्त आहे. ही देणगी म्हणजे ज्या कॉलेजने मला खूप काही दिले त्या कॉलेजसाठी आणि उद्याचे आपले जग घडवणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती असलेली माझी वचनबद्धता आहे असे नंदन नीलेकणी यांनी म्हंटल.
IIT BOMBAY नवीन 315 कोटी रुपयांच्या देणगीचे काय करणार?
आपल्या भविष्यातील योजना मांडताना, IIT-Bombay ने पुढील पाच वर्षांत $500 दशलक्ष (₹4,106 कोटी) निधी उभारणीची आवश्यकता असल्याचे सांगितले. नीलेकणी यांनी दिलेली 315 कोटींची देणगी संस्थेला निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजना सुरू करण्यास मदत करेल अस आयआयटी मुंबई कडून सांगण्यात आले.
दरम्यान, आयआयटी- मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिस चौधरी यांनी या देणगीबद्दल नंदन नीलेकणी यांचे आभार मानले आहेत. आमचे नामवंत माजी विद्यार्थी नंदन नीलेकणी यांनी संस्थेसाठी त्यांचे मूलभूत आणि अग्रगण्य योगदान अजूनही सुरू ठेवले आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांनी दिलेल्या या ऐतिहासिक देणगीमुळे IIT- मुंबईच्या वाढीला लक्षणीय गती मिळेल आणि जागतिक नेतृत्वाच्या मार्गावर दृढपणे प्रस्थापित होईल अस प्रा. सुभाषिस चौधरी यांनी म्हंटल.