चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक; राजकीय वातावरण तापणार

0
408
chandrakanat patil ink throw
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्याच्या या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असतानाच आज पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी चंद्रकांत पाटील आज आले होते. त्यावेळी ते आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं. शाईफेक करणारे नेमके कोणत्या पक्षाचे किंवा संघटनेचे समर्थक आहेत याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरील वादग्रस्त विधानावर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तरी सुद्धा त्यांच्यावर शाईफेक करत निषेध नोंदवण्यात आला आहे. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते

पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त विधान केले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली. त्याकाळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा शाळा उभ्या केल्या. मात्र, लोक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर विसंबून राहतात. त्याकाळात लोक दहा रुपये देणारे होते. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असे पाटील यांनी म्हंटले होते .