औरंगाबाद प्रतिनिधी | वंचित आघाडीचा घटक असणाऱ्या एमआयएममध्ये आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यात पहिल्यासारखे प्रेम राहिले नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. कारण वंचित आघाडीच्या धोरणावर एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एमआयएम आणि वंचितचे नाते कसे राहील याबद्दल खात्रीलायक काहीच सांगता येणार नाही.
काही दिवसापूर्वी आम्ही आम्हाला हव्या असणाऱ्या जागांची यादी वंचितकडे दिली होती. यावर निर्णय घेऊन आम्हाला कळवा असे आम्ही प्रकाश आंबेडकर यांना सांगितले होते. मात्र अद्याप त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे आम्हाला चिंता वाटू लागली आहे असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने वंचित आणि एमआयएममध्ये सगळंच काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसने ९०-९०-९० अशा विधानसभा जागांचा दिलेला फॉर्म्युला धुडकावला आहे. अर्थात ९० जागी काँग्रेस आणि ९० जागी राष्ट्रवादी तर वंचित ९० जागी असा तो काँग्रेसचा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी धुडकावला आहे. त्या जागी त्यांनी १४४ जागा आपण काँग्रेसला सोडायला तयार आहे असे म्हणले आहे. एकंदरच काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील वाटाघाटी बघता वंचित आणि काँग्रेस आघाडीची युती होईल असे म्हणता येणार नाही. त्यामुळे लोकसभे सारखे राज्यात तिरंगी लढत बघायला मिळणार हे मात्र निश्चित.