नवीन शहराध्यक्षांची निवड होताच राष्ट्रवादातीत अंतर्गत गटबाजी

sharad pawar ncp
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहर-जिल्हाध्यक्ष पदाची माळ ख्वाजा शरिफोद्दीन यांच्या गळ्यात घातली. या निवडीला आठवडाही उलटला नसतानाच पूर्वीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय साळवे, प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी मुंबईत नेते अजित पवार यांची गुरूवारी (ता. 9) भेट घेतली. उभयंतात या मुद्द्यासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या भेटीमुळे शहर जिल्हाध्यक्षाच्या पदालाच धक्का लागणार असल्याचे व बदलाच्या हालचाली होणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीचे आधीचे शहर जिल्हाध्यक्ष साळवे यांच्या जागी नवीन शहर जिल्हाध्यक्ष म्हणून ख्वाजा शरिफोद्दीन यांची वर्णी लागली. त्यांच्या निवडीवरून अनेक मतप्रवाह समोर आले आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीनही महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. अशावेळी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन शहर जिल्हाध्यक्षपदावर मुस्लिम चेहरा द्यावा, अशी मागणी एका बाजूने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून सूरू होती. ती लक्षात घेऊनच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ख्वाजा शरफोद्दीन यांची नियुक्ती केली व पक्षवाढीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. पण नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादीतील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व उलटसुलट चर्चा सुरू असल्यामुळे या नियुक्तीचा फेरविचार करावा, अशी मागणीही होत असल्याचे समजते.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, माजी जिल्हाध्यक्ष विजय साळवे व समर्थकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी कदीर मौलाना, साळवे यांचे म्हणणे ऐकून घेत कुठल्याही प्रामाणिक पदाधिकारी, कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. या संदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. त्यामुळे या नियुक्तीवरून राष्ट्रवादीत दोन गट असल्याचे व ते पक्षातील दोन ताकदवान नेत्यांशी स्वतंत्रपणे जुळवणुक करू पाहत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. आता उभय वरिष्ठ नेते काय तोडगा काढतील हे आगामी समीकरणांतून समोर येईल.