पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पवारांची चौकशी?? एकनाथ शिंदे म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना भाजपने शरद पवारांवर केलेल्या आरोपाविषयी विचारण्यात आले. तसेच तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर, “नाही, त्याची मी माहिती घेतो. मला माहिती घेऊ द्या. त्यानंतर मी नक्की बोलेन,” असं सावध उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. विलासराव देशमुख यांचेही याप्रकरणात नाव समोर येत आहे असं पत्रकारांनी म्हणताच त्यानंतरही मी माहिती घेऊनच मग सविस्तर बोलू असं म्हणत शिंदेनी अधिक बोलणं टाळलं.

भाजपचे पवारांवर आरोप काय?

शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर आहेत असा गंभीर आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे,यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा उपस्थितीत होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीचा आणि संजय राऊत यांचा काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी,अशी मागणी भातखळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.