मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जगात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाच्या आयपीएल हंगामांच्या नियमांत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला १२ लाख रुपयांचा दंड बसला होता. मुंबई संघाने एका सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला होता. रोहितला आकारण्यात आलेल्या दंडामुळे एका माजी क्रिकेटपटूने आनंद व्यक्त केला आहे.
आयपीएल २०२१ मध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल मुंबई इंडिन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इयान मॉर्गन या दोघांना दंड करण्यात आला होता. या दोघांवर करण्यात आलेल्या कारवाईवर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन याने समाधान व्यक्त केले आहे. केव्हिन पीटरसन म्हणाला कि टी-२० क्रिकेटमध्ये उशिर होण्यास कोणतीही जागा नाही. कारण हे एक मनोरंजन पॅकेज आहे यात कोणतीही छेडछाड व्हायला नको.
पीटरसनने आपल्या ब्लॉगमध्ये म्हणले आहे कि रोहित शर्मा आणि इयान मॉर्गन यांना या आठवड्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल दंड करण्यात आला. त्यामुळे हा खेळाडूंसाठी एक महान संदेश आहे. टी-२० प्रकारात खेळाडूंनी अनावश्यक वेळ घालवता कामा नये. प्रेक्षकांना तीन तासात हा खेळ पाहता आला पाहिजे. तसेच केव्हिन पीटरसन पुढे म्हणाला मी जेव्हा २००४ साली पहिल्यांदा टी-२० मॅच खेळली होतो तेव्हा स्कोअर बोर्डवर टायमर लावलेला असायचा तेवढ्या वेळेत ओव्हर पूर्ण कराव्या लागायच्या. यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नव्हती. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित आणि मॉर्गन यांच्या अगोदर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला देखील दंड आकारण्यात आला होता.