IRCTC – तुमचे ट्रेनचे तिकीट हरवल्यास आता काळजी करू नका, रेल्वेच्या ‘या’ नियमांद्वारे तुम्हांला होईल मदत

नवी दिल्ली । तसे पहिले तर सध्याचा काळ हा डिजिटल आहे. ट्रेनमधून प्रवास करताना बहुतेक प्रवासी तिकीट खिशात न ठेवता मोबाईलमध्ये घेऊन जातात. असे असले तरी अजूनही तिकीट खिडकीवरून तिकिटं बुक करून किंवा खरेदी करून मोठ्या संख्येने लोकं प्रवास करतात.

ट्रेनमधून प्रवास करताना खिशात ठेवलेले तिकीट कुठेतरी हरवले तर संपूर्ण प्रवासाची मजाच निघून जाते. पैसे खर्च केल्यानंतर TT येतोय की नाही याकडेच सगळे लक्ष लागून राहते. TT ने पकडले तर दंड ठोठावला जाईल, सगळ्या लोकांसमोर तुम्हाला लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागेल अशा प्रकारचे नको ते विचार मनात येत राहतात. मात्र आता घाबरण्याची अजिबात गरज नाही. तुमचे तिकीट हरवल्यास, तिकीट चेकर तुम्हाला तिकीटाशिवाय अडवू शकणार नाही किंवा मोठा दंड आकारू शकणार नाही.

वास्तविक, भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा देते. या नियमांची जाणीव ठेवली पाहिजे. जेणेकरून स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये कोणताही रेल्वे कर्मचारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. यासाठीच नियम जाणून घेतल्यास तुम्हांला TTE ला अतिरिक्त पैसे देणे टाळता येईल. त्याचप्रमाणे तिकीट हरवण्याबाबत रेल्वेचे वेगळे नियम आहेत. मात्र नियम माहीत नसेल तर तिकीट तपासणारी व्यक्ती गैरफायदा घेते आणि दंड वसूल करू शकते.

नवीन तिकीट जारी केले जाऊ शकते
जर तुमचे तिकीट हरवले आणि तुमच्या मोबाईलमध्ये तिकीट नसेल तर तुम्ही 50 रुपये दंड भरून नवीन तिकीट मिळवू शकता. तिकीट हरवल्यास, ताबडतोब TTE शी संपर्क साधा आणि त्याला संपूर्ण माहिती सांगा आणि नवीन तिकीट जारी करण्यास सांगा. यावर TTE काही अतिरिक्त शुल्क घेऊन नवीन तिकीट जारी करू शकतो.
रिझर्वेशन चार्ट तयार करण्यापूर्वी जर तुम्ही तिकीट हरवल्याची तक्रार केली तर तुम्हाला 50% शुल्कासह नवीन तिकीट दिले जाईल.

पुढील प्रवासासाठी
कोणत्याही कारणास्तव तुम्हाला निश्चित स्टेशनच्या पलीकडे प्रवास सुरू ठेवावा लागला तर तुमचे तिकीट पुढील स्टेशनपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. यासाठी वेगळे शुल्क भरावे लागेल.

प्लॅटफॉर्म तिकीट
जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करावा लागणार असेल तर हे तिकीट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. अशा परिस्थितीत, तुम्ही ट्रेनमध्ये असणाऱ्या TTE शी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जितक्या लांबचा प्रवास करायचा आहे तितके तिकीट मिळवू शकता. अशा परिस्थितीत, TTE तिकिटाच्या भाड्यासह विशिष्ट दंड आकारून तुम्हाला तिकीट जारी करू शकते. प्लॅटफॉर्म तिकिटाच्या आधारे, तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेतलेल्या त्याच स्टेशनवरून TTE तिकीट तयार करेल.

जर तुमची ट्रेन चुकली असेल तर प्रवासाच्या वेळेत ती तिकीट खिडकीवर परत केल्याने तुम्ही तिकीटाच्या मूल्याच्या काही भागाचा रिफंड (Indian railways refund rules) देखील मिळवू शकता.

You might also like