जालना प्रतिनिधी । जिल्हाधिकाऱ्यांनी खोटारडेपणा उघडकीस आणलेल्या बदनापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय जिल्ह्यांच्या सीमा ओलांडू नयेत अशा सूचना असतानादेखील बदनापूरचे गटविकास अधिकारी व्ही.एन.हरकळ हे रेड झोन असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातून अपडाऊन करून जालना वासियांचे आरोग्य धोक्यात टाकत असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी मागील आठवड्यात बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार आणि भोकरदनचे नायब तहसीलदार गणेश पोलास यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. आता अशीच कारवाई सदर गटविकास अधिकाऱ्यांवर होणार का असा प्रश्न जालना वासियांना पडला आहे.
जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी श्री रविंद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जालना जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद व बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून हे दोन्ही जिल्हे राज्य शासनाने रेडझोन घोषित केले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातून दररोज अपडाऊन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जालना येथे मुख्यालयी वास्तव्य करून रहावे असे आदेश जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बजावले होते. असे असतांनाही बदनापूरचे गटविकास अधिकारी व्ही.एन.हरकळ हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दररोज रेडझोन असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून सर्रासपणे दररोज अपडाऊन करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
याबाबत खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी तीन दिवसापूर्वी बदनापूर बीडीओच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कुठे आहेत अशी विचारणा केल्यानंतर हरकळ हे औरंगाबाद येथे असतांनाही आपण बदनापूर येथेच असल्याचे खोटे उत्तर देऊन जिल्हाधिकारी बिनवडे यांना थाप मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासकीय कामकाजाचा अनुभव पाठीशी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हरकळ यांची फिरकी घेत मोबाईल लोकेशन पाठविण्याचे आदेश देताच बोबडी वळलेल्या बीडीओनी सत्य जिल्हाधिकारी बिनवडेजवळ सत्य ओकले होते. त्यामुळे हरकळ यांना तात्काळ जालना येथे हजर होण्याचे आदेश श्री बिनवडे यांनी दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा यांची देखील कोणतीही परवानगी हरकळ यांनी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा यांनी हरकळ यांना काल शुक्रवारी सकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अशाच कारणांमुळे जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी मागील आठवड्यात बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार आणि भोकरदनचे नायब तहसीलदार गणेश पोलास यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून दोन बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली असली तरी अन्य कार्यालयाकडून अद्याप अशी धाडसी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हरकळ यांच्या विरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा या नेमकी काय कारवाई करतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.