काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधीच?? ही असू शकतात कारणं..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोनिया गांधी मागील २ दशकांहून अधिक काळ सांभाळत आहेत. मध्यंतरीच्या काळात राहुल गांधींकडे दिलेल्या अध्यक्षपदाचा काळ वगळता सोनिया गांधींचं पक्षावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालं आहे. मित्रपक्षाची मोट बांधण्यात सोनिया गांधींइतका अनुभव पक्षातील बाकी कुणालाच नाही. राजीव गांधींच्या जाण्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा काँग्रेसेतर नेत्यांकडे होती. मात्र त्यानंतर पुन्हा सोनिया गांधींनीच ही हायकमांड सांभाळली.

१९९९ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयींनी भाजप आणि मित्रपक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेचा आनंद उपभोगू दिला. मात्र त्यानंतर वाजपेयींच्या शायनिंग इंडियाची जादू मात्र जास्त काळ चालली नाही. २००४ ते २००९ काळात अगदी मुत्सद्दीपणाने राजकारण करत, प्रसंगी पंतप्रधान पदासाठी उचललेलं एक पाऊल मागे घेत सोनिया गांधींनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार हिंमतीने चालवून दाखवलं. या सरकारने पुन्हा आपल्या कामगिरीच्या जोरावर २००९ सालीही सत्ता काबीज केली. मात्र यानंतर काँग्रेस आणि मित्रपक्षातील नेत्यांवर लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अण्णा हजारे यांनी उठवलेला लोकपाल कायद्याचा मुद्दा, दिल्लीतील निर्भया हत्याकांड प्रकल्प या सर्वच गोष्टींचा फटका काँग्रेसला बसला. मागील ६ वर्षांपासून काँग्रेस आणि त्यांचे तत्कालीन सहकारी सत्तेपासून दूर आहेत.

फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबलेल्या भाजप पक्षाला काँग्रेसची वाताहत करायला जास्त वेळ लागला नाही, याचं कारण काँग्रेसमधील संघटना बांधणीचा अभाव. वरिष्ठ नेत्यांकडून कनिष्ठ कार्यकर्त्यांना, सदस्यांना विचारलं न जाणं, पक्षात आपल्या शब्दाला किंमत नसनं, जनतेतील वातावरण आपल्याला कमीपणा दाखवणारं, खिल्ली उडवणारं असणं यामुळे काँग्रेस पक्ष गलीतगात्र अवस्थेत गेला आहे. माध्यमांनीही काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या असून आजच कपिल सिब्बल यांना राहुल गांधींनी केलेल्या टीकेची खोटी माहिती मिळणं हासुद्धा त्याचाच एक भाग म्हणता येईल.

आज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ज्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलताना सांगितलं की, आमचा राहुल गांधींना विरोध नाही, मात्र पक्षाचा अध्यक्ष हा सर्वांना उपलब्ध होणारा आणि प्रभावी असावा.

घराणेशाहीचा आरोप होत असला, किंवा नेतृत्वावर शंका उपस्थित होत असली तरी काँग्रेसची शकलं होऊ द्यायची नसतील तर राहुल गांधी हेच अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहेत असं मत अनेक काँग्रेस नेत्यांसोबत राजकीय अभ्यासकांचंही आहे. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत आपण कमी पडत असलो हे सत्य असलं तरी मोदींसारख्या खोट्या नेत्याविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला एक व्हावच लागेल अशा आशयाचं ट्विट केलं आहे. अहमद पटेल, राजीव सातव, अशोक गेहलोत, सचिन पायलट, दिग्विजय सिंग, अशोक चव्हाण या काँग्रेस नेत्यांनाही काँग्रेसचं नेतृत्व गांधी कुटुंबियांतील कुणीतरी करावं असं वाटत आहे. मुकुल वासनिक, ए.के.अंटोनी ही नावं जरी अध्यक्षपदासाठी पुढं येत असली तरी लोकसभेत अधीर रंजन चौधरी यांची जी अवस्था अमित शहांनी केली आहे तशीच पुन्हा देशभर व्हायला नको हाही मुद्दा आहेच. स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येऊ न शकणाऱ्यांच्या हाती जर अध्यक्षपद गेलं तर काँग्रेसची नौका तीराला लागणं कठीण आहे.

नवा अध्यक्ष झाल्यास काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी होईल हे नाकारता येणार नाही. शिवाय ते नेतृत्व कितपत सर्वसमावेशक असेल याविषयी शंका आहेच. सध्या काँग्रेसला भाषणं देणाऱ्या आणि ट्विटरवर प्रतिक्रिया देणाऱ्या नेत्यांपेक्षा शांतपणे विचार करुन संघटना बांधणी करणाऱ्या, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. या सर्व घडामोडींचा अंदाज घेता आणि येत्या काळात बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांचा विचार करता राहुल गांधी यांच्या गळ्यातच काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडेल हे जवळपास निश्चित आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेतला जाईल. राहुल गांधींच्या गळ्यात ही माळ पडणार असेल तर ते जुनी मरगळ झटकून टाकून ते स्वीकारायला तयार आहेत का? की दुसरा सक्षम पर्याय तेच देणार, हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment