औरंगाबाद – औरंगाबाद शहरात काल एकाच दिवशी दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेत जालना रोडवर तरुणीचे रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला तर दुसऱ्या घटनेत रस्त्यावर तरुणीचे कपडे फाडण्यात आले. या वरुन भाजप नेत्या अनुराधा चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. वाढती गुंडगिरी ही तालिबानी वृत्तीकडे वाटचाल आहे का ? असा संतप्त सवाल त्यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.
संभाजीनगरातील वाढती गुंडगिरी ही तालिबानी वृत्तीकडे वाटचाल आहे का ?
आपल्या नैतिकतेवर आणि पोलीस प्रशासनावर प्रश्न निर्माण करणाऱ्या दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. चालत्या रिक्षात तरुणीवर ज्यांना आपण भैय्या म्हणतो त्या रिक्षा चालकानेच छेड काढली. pic.twitter.com/P3dBkWjqzA
— Anuradha Chavan (@AnuradhaChavan1) August 28, 2021
या संदर्भात त्यांनी आपल्या ट्विटमधून राज्य सरकावर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, ‘आपल्या नैतिकतेवर आणि पोलीस प्रशासनावर प्रश्न निर्माण करणाऱ्या दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. चालत्या रिक्षात तरुणीवर ज्यांना आपण भैय्या म्हणतो त्या रिक्षा चालकानेच छेड काढली. शेवटी मुलीने चालत्या रिक्षातून उडी घेतली अर्थात ती जखमी झाली. तर काही वेळानंतर वाळूज परिसरात रिक्षाचालकाने एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तरुणीस कपडे पुरविले. संभाजी महाराजांचे नाव असलेल्या शहरात अशा घटनांमुळे शरमेने मान खाली जातेच शिवाय महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांचा काहीच धाक उरला नाही का ? ॲक्शन मोड मध्ये येण्यासाठी गृहखाते कुणाची वाट पाहत आहे ?’
औरंगाबाद शहरातील या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. यावरुन भाजप नेत्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे.