पुणे । कोरोना व्हायरसवरमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळं कोरोनावरील लस शोधण्यात संपूर्ण जगात प्रयत्न सुरु आहेत. पण कोरोनाचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनावर लस कधी येणार या प्रश्नाचे उत्तर आज कोणाकडेही नाही. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांना याबाबत प्रश्न केला असता कोरोनाची लस यायला अजून किमान सहा महिने लागतील असं त्यांनी सांगितलं. पुण्यातील मायलॅबने आरटी पीसीआर टेस्ट करण्यासाठी नवीन मशीन आज लॉन्च केली. कोविडची टेस्ट करण्यासाठी आरटी पीसीआर टेस्ट सगळ्यात उपयुक्त आहे. या मशीनच्या लॉन्चिंग कार्यक्रमात अदर पुनावाला बोलत होते.
यावेळी कोरोना लसीबाबत विचारलेल्या प्रश्नावर अदर पुनावाला म्हणाले, “कोरोनाची लस यायला अजून किमान सहा महिने लागतील. या वर्षीच्या शेवटपर्यंत लस येणं अपेक्षित आहे.” सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डसोबत लस बनवण्यासाठी करार केला आहे. ऑक्सफर्डकडून लसीच्या सध्या मानवी चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याचे निकाल आले की आपण लस कधी येणार यासंदर्भात बोलू शकू, असंही अदर पुनावाला यांनी सांगितलं.
ते पुढे बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, “नुकतीच एक बातमी आली होती की, लस बनवण्यासाठी एका कंपनीला घाई करण्यात आली. आम्हाला अशी घाई नाही. सुरक्षित आणि प्रभावी लस देणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.” लस येईपर्यंत जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या करणं महत्त्वाचे असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलं. पण आपल्याकडे पाहिजे तेवढ्या चाचण्या होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कोरोनाच्या चाचण्यांसाठी आवश्यक असलेले टेस्ट किट्सचं पुरेसं उत्पादन करण्याची भारतीय कंपन्यांची क्षमता आहे. पण तेवढ्या चाचण्याच केल्या जात नाही, असं अदर पुनावाला म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”