हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. बंडखोर उमेदवार संजय पवार हे विजयी झाले आहेत. रवींद्र पाटील यांचा पराभव हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेचेच होते. महाविकास आघाडीकडून रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आल्यानंतर संजय पवार यांनी बंडखोरी केली. जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १० , शिवसेना शिंदे गटाचे ५, कॉंग्रेसचे ३, शिवसेना ठाकरे गटाचे २, तर भाजपचा १ सदस्य आहे. मात्र यावेळी झालेल्या गुप्त मतदानात २१ पैकी ११ मत संजय पवार यांना मिळाली तर पराभूत झालेल्या रवींद्र पाटील यांना १० मत मिळाली.
रवींद्र पाटील यांच्या पराभवानंतर जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आमच्याशी धोका झाला. राष्ट्रवादी काँग्रेसची जी १० मते होतील त्यातील एक मत फुटलं. परंतु शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी संजय पवार यांना समर्थन द्यावं. शिवसेना आणि काँग्रेसने आमचा विश्वासघात केला असं म्हणत खडसे यांनी संताप व्यक्त केला.