हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालन्यातील (Jalna Lathi Charge) मराठा समाजाच्या बांधवांवर लाठीचार्ज करण्यामागे राज्य सरकारचाच हात आहे. लाठीमार करण्यासाठी मुंबईतून एक अदृश्य फोन आला होता आणि त्यानंतर हा लाठीमार करण्यात आला असा गंभीर आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच हा फोन कोणाचा होता हे सरकारने सांगावे नाहीतर आम्ही सांगू असा इशाराही संजय राऊतांनी दिला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जालन्यात शांतपणे उपोषण सुरु होत, यामध्ये सरकारने चिडावं असं काय झालं? शासन तुमच्या दारी या कार्यक्रमाला गालबोट लागू नये, मराठा आंदोलनकर्त्ये त्याठिकाणी पोचवू नये यासाठी सरकारला मराठा समाजाचे आंदोल चिरडून टाकायचं होते. यासाठी मंत्रालयातून एक अदृश्य फोन आला असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच जर सरकार या संपूर्ण प्रकारणाची सखोल चौकशी करणार असेल तर हा अदृश्य फोन कोणाचा होता? मुख्यमंत्र्यांचा होता कि गृहमंत्र्यांचा होता कि दिल्लीतून आला आणि त्यानंतर पोलिसांनी निर्घृण लाठीमार केला असं संजय राऊत यांनी म्हंटल.
ज्यादिवशी संध्याकाळी हा लाठीमार सुरु झाला त्या दिवशी मुंबई मध्ये इंडिया आघाडीची महत्वाची बैठक सुरु होती. देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व मीडिया उद्धव ठाकरे काय बोलतील, राहुल गांधी काय बोलतील याकडे लक्ष्य ठेवून होती. त्यावरचे मीडियाचे लक्ष्य विचलीत करण्यासाठी हे लाठीमाराचे आदेश दिले का? असा सवालही संजय राऊतांनी केला.
आत्तापर्यंत मराठा समाजाने इतके मोर्चे काढले ते सर्व मोर्चे शांतपणाने काढले. अशाप्रकारचा बेशिस्तपणा त्यांच्याकडून कधी घडला नाही आणि पोलिसांनी सुद्धा कधी त्यांच्यावर लाठीमार केला नाही मग आत्ताच हे अचानक का घडलं? याची चौकशी करा. तो अदृश्य फोन कोणाचा होता याची चौकशी करा. या लाठीमारावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काय म्हणणं आहे हे स्पष्ट करावं असे म्हणत राऊतांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.