व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अमरनाथ यात्रेवर हल्ल्याच्या प्रयत्नांत असलेल्या ३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून खात्मा

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना आज मोठं यश आलं. जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह तिघांना चकमकीत ठार करण्यात आलं. या कारवाईत लष्कराचे तीन जवानही जखमी झाले आहेत. हे दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ल्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. वलीद असं त्याचं नाव असून तो पाकिस्तानी नागरिक होता. गेल्या दीड वर्षापासून तो या भागात सक्रिय होता. सुरक्षा दलांनी आतापर्यंत चार वेळा केलेल्या कारवाईत घेरा तोडून तो पळून गेला होता. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी तो एक होता, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.

दरम्यान, या चकमकीनंतर लष्कराकडून एक महत्वाचा खुलासा केला. काही दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. राष्ट्रीय महामार्ग ४४ हा संवेदनशील प्रकारात मोडतो. कारण याच मार्गावरून अमरनाथच्या दिशेने यात्रेकरू जात असतात. अमरनाथ यात्र ४ दिवसांनंतर सुरू होणार आहे. या यात्रेपूर्वी दहशतवाद्यांविरोधात यशस्वीपणे कारवाई करण्यात आली आहे. यात्रा शांततेत आणि सुरक्षितपणे पूर्ण होईल, हा संदेश आम्ही नागरिकांना दिला आहे. अमरनाथ यात्रेकरूना कुठल्याही अडथळ्याशिवाय यात्रा करता येईल, असं भारतीय लष्कराचे ब्रिगेडीयर आणि सेक्टर २ चे कमांडर व्ही. एस. ठाकूर यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”