हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्य सरकार विरोधात मैदानात उतरले आहेत. परंतु आता त्यांची प्रकृती पुन्हा खालवली आहे. राज्यभर दौरे करत असताना प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना सलग 3 दिवस आराम करण्याची आणि योग्य उपचार सेवा घेण्याची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिले आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 23 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे. परंतु आताच्या घडीला जरांगे पाटील यांचे राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे पार पडत आहेत. यादव यादरम्यानच त्यांना अशक्तपणा आल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जरांगे पाटील यांना दौरे रद्द करून योग्य उपचार सेवा घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, मध्यंतरी राज्यात मराठा आरक्षणामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यात सलग काही दिवसांसाठी जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होते. परंतु, जनतेच्या सांगण्यावरून आणि सरकारने मागितलेल्या वेळेमुळे जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. परंतु या काळात अन्नग्रहण न केल्यामुळे त्यांची प्रकृती जास्त बिघडली. यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बरेच दिवस उपचार सेवा घेतल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले. मात्र आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावली गेली आहे. त्यामुळे ते छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.