हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळाले. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली. त्यानंतर मागच्या महिन्यात अजित पवारांनी थेट शरद पवारांशी फारकत घेत राष्ट्रवादीतच वेगळा गट निर्माण केला आणि शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील (Jayant Patil) हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असून आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुण्यात भेट घेतल्याच्या बातम्या पसरत आहेत.
अमित शहा आज पुण्यात असून जयंत पाटील यांनी सकाळीच जे. डब्ल्यू मॅरीएट हॉटेलमध्ये त्यांची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात भेट घडवून आणल्याचे बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन जयंत पाटलांना बोलावून घेतल. त्यानंतर अमित शाह, अजित पवार, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या चार नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याच्या बातम्या आहेत. या भेटीत नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु यामुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाना पुन्हा एकदा जोर आला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली तरी जयंत पाटील हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. मात्र तरीही गेल्या काही दिवसांपासुन सातत्याने जयंत पाटील हे सुद्धा दादा गटात जाणार असल्याच्या बातम्या पसरत होत्या. इतकंच नव्हे तर जयंत पाटलांसाठीच एक महत्त्वाचे खाते राखून ठेवल्याची चर्चा होती. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा एका प्रश्नाला उत्तर देताना जयंतराव आमचं तुमच्याकडेच लक्ष्य आहे, पण तुम्हीच आमच्याकडे बघेना असा सूचक संदेश अजित पवारांनी दिला होता. त्यामुळे जयंत पाटील काय भूमिका घेतात हे आता पाहावं लागेल.