हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसासनिमित्त आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सूचक ट्विट करत लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असं म्हंटल होते. मिटकरी यांच्या ट्विटने राजकीय खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे का? अशा चर्चाना उधाण आलं. खरच सध्याच्या राजकीय परिस्थितीत अजित पवार मुख्यमंत्री होतील का? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याना विचारलं असता त्यांनी राजकीय गणितच मांडलं.
मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील याना अमोल मिटकरी यांच्या ट्विट बाबत विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, मिटकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार होतील असे मत व्यक्त केले असले तरी त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यावर मला काय बोलायचं नाही. सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे मी कसे सांगू शकणार. आज शिंदे – फडणवीस आणि अजित पवारांचे महायुतीचे सरकार आहे, त्यात अजित पवार सध्याच्या गणितात मुख्यमंत्री कसे होऊ शकतात ते कळल्याशिवाय यावर बोलणं योग्य होणार नाही असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाही मिटकरी यांच्या ट्विटनंतर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा सवाल केला असता त्यांनी सूचक इशारा दिला. भावी म्हणजे त्याला किती काळ आहे? दोनजण ( एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ) मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. एक अद्याप व्हायचे आहेत. आता नियतीच्या मनात काय आहे हे माहिती नाही. परंतु लोकांच्या तशा अपेक्षा आहेत” असे मुश्रीफ यांनी म्हंटल होते.




