पंतप्रधान मोदींनी तरी कुठे घराबाहेर पाऊल टाकलं? भाजपच्या टीकेला जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. सरकारच्या अपयशाच्या निषेधार्थ भाजपनं आज राज्यभरात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ हे आंदोलन केलं. ‘काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र भाजपच्या या सरकारविरोधी आंदोलनाचा समाचार घेतानाच या आंदोलनापासून जनतेनं सावध राहावं, असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रावर कोरोनाच संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका केली होती. त्याला जयंत पाटील यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले कि, “चंद्रकांत पाटलांना आधी पण सल्ला दिला होता की घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन आहे. सगळे जण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कुठे बाहेर गेले? त्यामुळे चंद्रकांतदादा ऐकतील, असा विश्वास आहे,” असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

आजच्या आंदोलनावेळी केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. शिवाय “केंद्राने राज्याला पैसे दिले याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी गैरसमज झाला आहे,” असं म्हणत फडणवीसांच्या मागणीतली हवा काढण्याचा प्रयन्त केला.

दरम्यान, राज्यात आज ठिकठिकाणी भाजपनं सरकारविरोधात निदर्शनं केली. राज्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या अंगणात येऊन सरकारचा निषेध नोंदवला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”