मुंबई प्रतिनिधी |बीड जिल्हयाच्या राजकारणात दोन पिढ्यांचा दबदबा असणारे क्षीरसागर कुटुंब आता अंतर्गत वादाने घेरले आहे. अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडणे पसंत केले आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवकाश बाकी असतानाच जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश पार पडणार आहे. हा कार्यक्रम मातोश्रीवर छोटेखानी स्वरूपात पार पडणार आहे.
एप्रिल महिन्यात जयदत्त क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या शिवसेना प्रवेशावर विस्तृत चर्चा झाली होती, त्याच प्रमाणे जयदत्त क्षीरसागर हे माजी मंत्री असल्याने त्यांना येत्या काळात मंत्रीपद देखील दिले जाण्याची शक्यता आहे. जयदत्त क्षीरसागर हे बीडच्या राजकारणात महत्वाचे स्थान असणारे नेते आहेत. तसेच त्यांनी या आधी आघाडीच्या सरकार मध्ये मंत्री म्हणून देखील काम केले आहे.
दरम्यान धनंजय मुंडेंच्या वर्चस्ववादी राजकारणाला कंटाळून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी दिली आहे. याच मुद्द्याला धरून या आधी आमदार सुरेश दस यांनी राष्ट्रवादी सोडली होती. एकंदरच धनंजय मुंडे यांच्या एकछत्र बनवण्याच्या राजकारणाला कंटाळून अनेक लोक राष्ट्रवादी सोडून चालले आहेत. जयदत्त क्षीरसागर यांच्या पुतण्याला जवळ करून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घरात उभी फुट पाडली आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात आगामी काळात लढाई छेडली जाण्याची शक्यता आहे. येत्या विधान सभेला जयदत्त क्षीरसागर शिवसेनेचे तर संदीपक्षीरसागर राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे बीडची विधानसभा राज्याचे लक्ष वेधणारी ठरणार आहे.