जयकुमार गोरे यांना दणका; हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठी आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळल्यानंतर गोरेंनी हाय कोर्टात धाव घेत तेथे अर्ज दाखल केला. मात्र, तेथेही अर्ज फेटाळून लावत हायकोर्टाने त्यांना दणका दिला आहे. त्यामुळे गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उच्च न्यायालयात जयकुमार गोरे यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने गोरे यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच याचिकाकर्त्याला संबंधित कागदपत्र सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 17 मे पर्यंत तहकूब केली. त्यामुळे आता आमदार गोरे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील मायणी येथील पिराजी विष्णू भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून जमिनीचे बोगस दस्तऐवज तयार करण्यात आले होते. यामध्ये भिसे कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद नोंदवली. त्यानंतर त्यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, बोगस दस्तऐवज फसवणूक प्रकरणी भिसे यांच्या नावाने सह्या करणाऱ्या संजय काटकरला पोलिसांनी याआधीच अटक केली. तसेच न्यायालयाने त्याला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, जयकुमार गोरे यांच्यावतीने त्यांचे वकील संदेश गुंडगे यांनी सातारा प्रमुख जिल्हा न्यायाधीशांसमोर अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी संदर्भात अर्ज सादर केला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर अखेर आमदार गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी सर्ज दाखल केला. त्यावर आज सुनावणी पार पडली. व त्याही ठिकाणी त्याचा अर्ज फेटाळून लावल्यामुळे गोरेंना चांगलाच धक्का बसला आहे.

Leave a Comment