वळसे पाटील कृतघ्न, महाराष्ट्र्र क्षमा करणार नाही; पवारांवरील टीकेनंतर आव्हाड आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रथमच शरद पवारांवर (Sharad Pawar) थेट टीका केल्याने खळबळ उडाली आहे. पवारांना कधीच स्वतःच्या ताकदीवर एकहाती सत्ता मिळवता आली नाही असं म्हणत वळसे पाटलांनी त्यांच्या वर्मावरच बोट ठेवलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वळसे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे. वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले, ते कृतघ्न निघाले. पण महाराष्ट्र क्षमा करणार नाही, आंबेगाव धडा शिकवेल असं म्हणत आव्हाडांनी वळसे पाटलांवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हंटल, हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याच आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले.

वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही… पण आदरणीय साहेबांच्यासाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांविषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे . महाराष्ट्र विसरणार नाही, क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले होते?

मंचर येथील एका कार्यक्रमात बोलत असताना वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या आत्तापर्यंतच्या राजकारणाची चिरफाड केली आहे. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो. परंतु दुसऱ्या बाजूला पवार साहेबांच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही बहुमत दिले नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही. अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत. ते पुढे जात आहेत, पण आम्ही काय ६०- ७० जागांच्या पुढे जाऊ शकत नाही. मग कोणाशी तरी आम्हाला आघाडी करावी लागते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असं वळसे पाटील यांनी म्हंटल.