हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला आहे. “त्यांच्यावर कोणतं संकट येऊ घातलेलं आहे, याची त्यांना कल्पनाही नाही. या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि नाटो देश युक्रेनच्या एक-एक इंच जमिनीचं रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल,”अशा शब्दांत जो बायडेन यांनी इशारा दिला आहे.
जी बायडेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “त्यांच्यासमोर आता मोठं संकट उभे राहणार आहे. त्यांना अजिबात कल्पना नाही की कोणतं संकट त्यांच्यावर येऊ घातलं आहे. आज मी ही घोषणा करतो की आम्ही आमच्या मित्र देशांसमवेत मिळून रशियाच्या कोणत्याही प्रकारच्या विमानांसाठी आमची हवाई हद्द पूर्णपणे बंद करतोय”, असे जो बायडेन यांनी म्हंटले आहे.
रशियन सैन्याच्यावतीने युक्रेनची राजधानी किव्हला लक्ष्य करण्यात आले आहे. किव्हमधील अनेक इमारतींवर रॉकेट्सने हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी युरोपियन संसदेसमोर केलेल्या भाषणात जगासमोर मदतीची विनंती केली आहे. “आम्ही मजबूत आहोत. आम्ही स्वातंत्र्यासाठी, जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तुम्ही सिद्ध करा की आम्हाला एकटं सोडणार नाही”, असं आवाहन त्यांनी केले.