हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून बहुजन विकास आघाडी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्याशी आघाडी करण्याबाबत विधाने केली जात होती. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. स्वतः जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत पत्रकार परिषद घेत आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जोगेंद्र कवाडे याची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रा. कवाडे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आमची युती होत आहे. शिव, शाहू, फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे.
थोर महामानवांच्या विचारावर आमची आघाडी वाटचाल करेल. आम्ही युतीच्या माध्यमातून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणार असून शिंदे यांच्याकडे 41 जागा मागितल्या असल्याचे कवाडे यांनी सांगितले.
नरिमन पॉईंट, मुंबई येथील 'बाळासाहेब भवन' येथे प्रसारमाध्यमांशी संवाद https://t.co/7MUm9tXWOo
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2023
आमचा संघर्षही साधासुधा नव्हता ; मुख्यमंत्री शिंदे
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की, आम्हीही लाठ्या- काठ्या खाल्ल्या. त्या खाऊनच आम्ही इथपर्यंत पोहचलो आहे. आम्हीही साधासुधा संघर्ष केला नाही. कवाडेंच्यासोबत आमचे पूर्वीपासून चांगलेच संबंध होते.