अहमदनगर प्रतिनिधी । सुशील थोरात
नाशिक आणि जळगाव येथे भरदिवसा बँकेवर दरोडा पडले आहेत. त्याचप्रमाणे नगरमधील महामार्गालगत असणार्या बँकेच्या एटीएम चोरांनी फोडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने बँक आणि एटीएममधील रकमेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज बैठक बोलावली होती. या बैठकीला नगर शहरातील सर्वच बँकांच्या शाखेचे अधिकारी सहभागी झाले होते.
एका खाजगी राष्ट्रीय बँकेच्या नगरमधील शाखा अधिकाऱ्याने एटीएम आणि एटीएममधील रकमेच्या सुरक्षितेच्या विषयी वेगळी भूमिका मांडली. या ठिकाणी असलेल्या रकमेच्या सुरक्षिततेची जबाबदारी बँकेच्या अधिकाऱ्यांवर नाही, अशी भूमिका या शाखा अधिकाऱ्याने मांडली. त्याचे कारण देताना या शाखा अधिकाऱ्याने एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी काही खासगी संस्थांना जबाबदारी दिली आहे. त्यामुळे रकमेची जबाबदारी त्या खाजगी संस्थावर आहे असा दाखला दिला. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे शाखा अधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रचंड संतापले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना शाखा अधिकारी मांडलेले भूमिकेची दखल घेण्यास सांगून त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना केली. शाखा अधिकाऱ्यांच्या या भूमिकेचा स्वतंत्र अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक आणि महानिरीक्षकांना देण्याचाही विचार ईशू सिंधू यांनी बैठकीत बोलून दाखवला. यावर शाखा अधिकाऱ्याला आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेविषयी दिलगिरी व्यक्त करत रकमेची जबाबदारी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांचीच असल्याचे कबूल केले आणि भूमिका बदलली.
या वेळी बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्इशन करताना पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सांगितले की बँकेमधील जमा होणारी रक्कम ही सर्वसामान्य जनतेचे आहे. प्रत्येक बँकेच्या सुरक्षेसाठी आम्ही चौकीदाराची भूमिका निभावू शकत नाही. परंतु बँकेमध्ये रक्कम सुरक्षित राहण्यासाठी बँकेने बदलत्या तंत्रज्ञानानुसार अद्यावत प्राणी अवलंबावी. सायबर सेलशी संपर्क करावे. समाज माध्यमांचा वापर करून पोलीस दल आणि बँक अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवावा. चोरांपासून एटीएम कसे सुरक्षित ठेवता येईल याचे नियोजन करावे. एटीएम आणि बँकेच्या सुरक्षितता व्यवस्थेचे वारंवार ऑडिट करावे. यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यासह जिल्हा पोलीस दल संपूर्ण सहकार्य करेल.