कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुका व कडेगाव तालुका येथून दुचाकी चोरणार्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राजन मधुकर भोसले (वय 21, रा. विहापूर, ता. कडेगाव, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील आठ दिवसापूर्वी करवडी ता. कराड येथील किशोर पिसाळ यांनी त्यांची घरासमोर पार्किग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार तालुका पोलिसात दिली होती. त्याअनुषंगाने तपास करीत असताना मंगळवारी साकुर्डी ता. कराड गावच्या हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत असताना एक संशयित मोटारसायकल स्वार पाटण बाजूकडून कराडकडे येत असल्याचे दिसले. त्यास थांबवून दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने काही माहिती दिली नाही. त्याच्याबाबत पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यास चौकशीकामी ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने करवडी येथून बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. तसेच विहापूर ता. कडेगाव येथून स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरून आणल्याचे सांगितले.
पोलिसांनी राजन भोसले याच्याकडून दोन्ही मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्याच्याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यातून अधिक माहिती घेतली असता त्याच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले. विहापूर येथील मोटारसायकलबाबत शहाजी राजाराम चव्हाण यांनी कडेगाव पोलिसात तक्रार नोंद केली आहे. राजन भोसले यास पोलिसांनी अटक केली असून त्याने आणखी कोणते गुन्हे केले याबाबत पोलीस तपास करीत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार लावंड करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार उत्तम कोळी, सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार, शशिकांत घाडगे, सागर बर्गे यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’