बंगळुरू | कर्नाटक राज्याचे राजकारण नवीन वळण घेत आहे. मागील काही दिवसापासून सुरु असलेला सत्ता संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही असे चित्र सध्या दिसते आहे. कारण विधानसभा अध्यक्षांनी कुमार स्वामी सरकारची १८ जुलै रोजी बहुमत चाचणी ठेवली आहे. भाजपच्या नेत्यांनी हि विनंती विधानसभा अध्यक्षांना केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर करण्याआधी विधानसभा अध्यक्षांना कुमार स्वामी आणि सिद्धरामय्या भेटले होते.
कुमार स्वामींनी आधी बहुमत सिद्ध करून दाखवावे नंतरच त्यांनी बाकीच्या बाबीचे प्रयत्न करावे असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. कुमार स्वामी गुरुवारी बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आसणाऱ्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात
उद्या मंगळवारी १२ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केली जाणार आहे. या आधी झालेल्या सुनावणीत १६ जुलैपर्यत विधान सभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर कसलाही निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यामुळे कुमार स्वामी आणि काँग्रेस नेत्यांना बंडखोर आमदारासोबत चर्चा करण्यास वाव मिळाला होता.