नवी दिल्ली | आम्ही स्वमर्जीने राजीनामा दिला आहे. तरी देखील असंविधानिक कारणे पुढे करून आमचे राजीनामे मंजूर केले जात नाहीत असा आक्षेप घेऊन १२ बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली यात मंगळवार पर्यंत कोणताच निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत.
कर्नाटकात जाऊन अध्यक्षांपुढे राजीनाम्याचे स्पष्टीकरण द्यावे लागू नये म्हणून बंडखोर आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारपर्यंत राजीनाम्यांवर कोणताच निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. येत्या मंगळवारी या राजीनाम्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. तर मंगळवार पर्यंत कर्नाटक मधील सत्ता संघर्ष असाच चालू राहणार असल्याचे आजच्या सुनावणी स्पष्ट केले आहे.