बंगळुरू : वृत्तसंस्था – शेतातील वाईट आत्मांना पळवण्यासाठी एका १० वर्षाच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ग्रामीण बेंगळुरू येथे एका पुरोहितासह पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी कर्नाटकमधील अमानुष दुष्कर्म प्रतिबंध आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विधेयक, अपहरण आणि धमकी या अंतर्गत पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि घटना १४ जून रोजी नेलामंगलाजवळील गांधी गावामध्ये घडली आहे. हि मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती, तर तिचे आई-वडील मगदी येथे राहून मजुरी करतात.
आजीने मुलीच्या किंचाळ्या ऐकल्या
दहा वर्षांच्या मुलीच्या पालकांनी प्रसाद अर्पण करण्याच्या बहाण्याने शेजारी सविथ्रम्मा आणि सौम्या आपल्या मुलीला जवळच्या शेतात नेल्याचा आरोप केला आहे. या मुलीने तिच्या पालकांना सांगितले की, त्या लोकांनी जबरदस्तीने हार घालून काही धार्मिक विधी करण्यास सुरूवात केली. तेव्हा या मुलीच्या आजीच्या लक्षात आले की, १० वर्षांची मुलगी हरवली आहे. यानंतर तिने सगळीकडे शोधाशोध सुरु केली. तेव्हा तिला जवळच्या शेतातून मुलीच्या किंचाळ्या ऐकू आल्या. यानंतर आजीने मुलीची सुटका झाली आणि तिने घटनेबाबत पोलिसांना सांगितले. या घटनेतील आरोपी हे मुलीचा बळी देण्याच्या प्रयत्नात होते.
जेव्हा या पाच जणांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी असा दावा केला कि, त्यांनी मुलीला एका सोहळ्यासाठी शेतात आणले होते. आरोपींनी पुढे सांगितले कि,त्यांना त्यांच्या शेतात मंदिर बांधायचे आहे आणि पुजार्याने एका अल्पवयीन मुलीला पूजा करण्यास सांगितले होते. यानंतर आरोपी तक्रार मागे घेण्याची धमकी देत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.