Friday, June 2, 2023

निविदा घ्या म्हणत अंगावर ओतून घेतले रॉकेल

औरंगाबाद – घनसावंगी तालुक्यातील रांजणी ते कुंभार पिंपळगाव ते राजाटाकळी या रस्त्याच्या 200 कोटींतून दुपदरीकरण व मजबुतीकरणाच्या कामासाठी ऑनलाईन व ऑफलाइन निविदा भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. कंत्राटदाराची निविदा घेण्यास नकार देताच त्याने अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांच्या दालनात घडल्याने एकच गोंधळ उडाला.

ऑफलाइन निविदा स्वीकारली जात नसल्याचे बघून नाशिकचे कंत्राटदार पवन पाटील यांनी मुख्य अभियंता यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून घेताच विभागातून निघून गेलेल्या अधिकारी-कर्मचारी पळत आले आणि त्यांनी निविदा स्वीकारली. नाशिकच्या जे. एम. म्हात्रे आणि एस.ए. सावंत फर्म कडून पाटील हे ऑफलाईन तांत्रिक निविदा सादर करण्यासाठी बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता कार्यालयात सकाळी आले होते.

आवक-जावक विभागाकडे त्यांनी विनवणी केली नकार मिळाल्यानंतर ते मुख्य अभियंता दिलीप उर्कीडे यांच्या दालनात गेले. निविदा स्वीकारली नाहीतर आत्मदहन करीन असा इशारा देत त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले.