तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी; भाजपची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

0
84
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजप नेते शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मनसे भाजपचे हिंदुत्त्व नकली आहे हे लोकांना पटवून द्या आणि भाजप मनसे वर तुटून पडा असे स्पष्ट आदेश शिवसेना नेत्यांना दिले आहेत. त्यांनतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य यांनी एकामागून एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झालीय असा टोला त्यांनी लगावला.

भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना नुकतेच दिलेत म्हणे. त्यात भाजपाचं हिंदुत्व खोटं ठरवण्यासही सांगितलंय. पण ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलंय. ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध केवळ बोलण्यापुरता राहिलाय. त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वावर बोलूच नये. भाजपासाठी हिंदुत्व हा आत्मा आहे. असे केशव उपाध्ये यांनी म्हंटल.

तुमच्यासारखं गरज असेल तेव्हा वापरलं आणि नसेल तेव्हा सोडून दिलं, असलं आम्ही कधी केलं नाही. म्हणूनच राम मंदिर, कलम ३७०सारखे मुद्दे आम्ही मार्गी लावलेत. आज तुम्ही हिंदुत्वाला अनुकूल अशी कुठलीही भूमिका घेतलीत तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील, म्हणूनच तुम्ही त्यांना सोईस्कर अशाच भूमिका घेताय, त्यात हिंदू हित शुन्य आहे.

थोडक्यात तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झालीय. तो केवळ डरकाळ्या फोडू शकतो, त्याकडून बाकी काही होणे शक्य नाही. तुमच्या नाकर्त्या कारभारामुळे तुमचे कार्यकर्ते तुमच्यापासून ‘तुटले’ आहेतच. ‘पडा’यचे बाकी आहे, ते निवडणुकीत होऊन जाईल! असा इशारा केशव उपाध्ये यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here