हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद आणि पत्नीवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
हसन मुश्रीफ परिवारानं शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. त्याचे पुरावे मी आयकर विभागाला सादर केले आहेत. सीआरएम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडमधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं कर्ज घेतलं असल्याचं दाखवलं आहे. असे सोमय्यांनी म्हंटल.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात ताहेरा हसन यांच्या नावानं शेअर्स असल्याचं समोर आलं आहे. 2017 मध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाचा छापा पडला. त्यात 127 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्या मुंबई येथे जाऊन ईडी कडे अधिकृत तक्रार करणार असल्याचे देखील किरीट सोमय्या यांनी म्हंटल आहे.