सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
सातारा शहरातील बुधवार पेठेत किचन ट्रॉलीच्या फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीमुळे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील बुधवार पेठेतील एका किचन ट्राॅली फर्निचरच्या दुकानाला आज सकाळी अचानक आग लागली. रस्त्याशेजारीच असलेल्या या दुकानाला आग लागल्याने लोकांची मोठी धावपळ उडाली. दुकानाचे मालक मोहसीन बागवान यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या तासाभरापासून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सातारा शहरात किचन ट्रॉली, फर्निचर दुकानाला भीषण आग pic.twitter.com/aoLidwplo8
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) December 24, 2022
दुकानाला लागलेली भीषण आग विझविण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दल आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. दुकानाला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दुकानशेजारी उभी असलेल्या एका दुचाकीलाही आगीची झळ बसलेली आहे.